राजू शेट्टी यांना भाजपकडून लोकसभेसाठी साकडं!

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना भाजपकडून लोकसभेसाठी साकडं घालण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. राजू शेट्टीने महायुतीमध्ये सहभागी व्हावं यासाठी त्यांना केंद्रीय नेतृत्वाकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण राजू शेट्टी यांच्याकडून मात्र त्याला अद्याप कोणताही प्रतिसाद देण्यात आला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

या आधी राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीकडून लोकसभेला पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न केल्याची चर्चा सुरू होती. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेटही घेतल्याची चर्चा होती. पण ती राजकीय भेट नव्हती असं स्पष्ट करून राजू शेट्टी यांनी आपण स्वतंत्र लढणार असल्याचं जाहीर केलं होतं. 

राजू शेट्टी यांनी 2009 आणि 2014 साली असं दोन वेळा हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती. 2019 साली शिवसेनेच्या धैर्यशील माने यांनी त्यांचा पराभव केला होता. हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीच्या शिवसेना ठाकरे गटाकडे आहे, महायुतीच्या शिवसेना शिंदे गटाकडे आहे. त्यामुळे या ठिकाणी शिंदे गटाकडून विद्यमान खासदार धैर्यशील माने यांची उमेदवारी पक्की समजली जात आहे. त्यामुळेच राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीकडून लढावं यासाठी ठाकरे गटाचा प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून काही दिवसांपूर्वी राजू शेट्टी आणि उद्धव ठाकरे यांच्यात भेटही झाली होती.