गावागावांत अनेक उपक्रम हे राबवले जातात आणि या उपक्रमांचा सामान्य जनतेला पुरेपूर लाभ व्हावा यासाठी सर्वजण अगदी प्रयत्नशील देखील राहतात. जेणेकरून सामान्य जनतेला कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात २०२३ अखेर सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने राज्यात पहिला क्रमांकावर बाजी मारली आहे.
आरोग्याच्या विविध योजना व उपक्रम प्रभावीपणे राबविल्याने सोलापूर जिल्हा राज्यात अग्रेसर ठरला आहे.राज्यात आरोग्य विभागाअंतर्गत जवळपास ३५ उपक्रमांआधारे सर्व जिल्हा परिषदांचे मूल्यांकन केले जाते. यामध्ये माता आरोग्य, बाल आरोग्य, लसीकरण, क्षयरोग दुरीकरण, कुष्ठरोग शोध मोहीम, असंसर्गीय आजार प्रतिबंधात्मक उपाययोजना, आयुष्यमान भारत योजना, गुणवत्ता आश्वासन, कुटुंब कल्याण कार्यक्रम, आर्थिक खर्चाचा आढावा, मनुष्यबळ माहिती अद्ययावत करणे, टेली कन्सल्टेशन तसेच राष्ट्रीय नागरी अभियानांतर्गत हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, साथरोग नियंत्रण कार्यक्रम असे उपक्रम समाविष्ट आहेत.
या सर्व योजना व उपक्रम प्रभावीपणे राबविणाऱ्या सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला राज्यात पहिला क्रमांक मिळाला आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त धीरजकुमार यांनी पत्र पाठवून सोलापूर जिल्हा परिषदेला त्यासंदर्भातील माहिती दिली आहे.
राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात सोलापूर जिल्ह्यासाठी ४३.१२ गुण आहेत. तर सांगलीला ४२.४६, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यास ४१.६ गुण मिळाले आहेत.