कोयनेतील पाण्याचा वाद पेटणार….

यंदा पर्जन्यमान कमी झाल्यामुळे आता हिवाळ्यातच दुष्काळाचे चटके बसत आहेत. कोयना धरणात पाणीसाठा कमी असल्यामुळे बारमाही हरित असलेल्या कृष्णा-कोयना काठालाही टंचाईची झळ बसू लागली आहे. कोयना धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्यावरून सातारा व सांगली जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधींमध्ये खडाजंगी सुरू आहे. त्यामुळे उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यावर हक्क सांगत ते मिळवण्याचा प्रयत्न सांगली जिल्ह्यातील राजकीय नेते करत आहेत. त्यासाठी साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना टार्गेट केले जात आहे.

खासदार संजयकाका पाटील यांनी, तर कोयनेच्या पाण्यासाठी खासदारकी पणाला लावण्याचा इशारा दिला आहे. सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनीही पाण्यासाठी साताऱ्याच्या पालकमंत्र्यांना टार्गेट केले, तर आमदार लाड यांनी मोर्चा काढून प्रशासनाला इशारा दिला. मात्र, साताऱ्याचे पालकमंत्री देसाई यांनी सावध पवित्रा घेतला आहे. कोयना धरणातील पाण्यावरून यापुढील काळात दोन्ही जिल्ह्यांतील नेत्यांमध्ये खटके उडण्याची चिन्हे आहेत.