सांगली लोकसभा मतदारसंघ जागावाटपात ठाकरे गटाच्या वाट्याला गेल्याने विशाल पाटील हे नाराज आहेत. त्यांचं नाराज होणं स्वाभाविक आहे. मात्र, आम्ही त्यांची समजूत काढू, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुंबईत महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत मविआकडून मतदारसंघनिहाय जागावाटपाचे चित्र स्पष्ट करण्यात आले. यामध्ये सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेली सांगली लोकसभेची जागा ठाकरे गटाकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विशाल पाटील आणि विश्वजीत कदम प्रचंड नाराज झाले आहेत.
या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी ‘एबीपी माझा’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगली लोकसभेच्या जागेवरुन सुरु असणाऱ्या राजकीय नाराजीनाट्याबाबत भाष्य केले. यावेळी पटोले यांना, चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विशाल पाटील दिसणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले यांनी म्हटले की, विशाल पाटील नाराज आहेत, पण आम्ही त्यांची समजूत काढू. भाजपने महाराष्ट्राच्या राजकारणाची सगळी घडी विस्कटून टाकली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच नव्हे तर महायुतीमध्येही जागावाटपावरुन वाद पाहायला मिळत आहेत. युतीच्या राजकारणात काही गोष्टी सहन कराव्या लागतात. युतीत असे वाद होतात आणि ते न संपणारे असतात, असे नाना पटोले यांनी सांगितले.