राज्यातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ आणि साडेबाराशे महसूल मंडळांमध्ये दुष्काळसदृश स्थिती जाहीर करण्यात आली. मात्र, अजूनपर्यंत दुष्काळी शेतकऱ्यांना दमडीचीही भरपाई मिळालेली नाही.
राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केल्यानंतर केंद्रीय पथकाकडून पाहणी आणि त्यानंतर त्यांच्या अहवालानुसार राज्य सरकारला केंद्राकडून शेतकऱ्यांसाठी मदत दिली जाते.पण, मदत मिळण्याचा कालावधी निश्चित नसल्याने अडचणीतील बळिराजाला काही महिने वाट पाहावी लागते.
राज्यातील ४० दुष्काळी तालुक्यांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, माळशिरस, करमाळा, बार्शी व माढा या पाच तालुक्यांचा समावेश आहे. दुष्काळसदृश महसूल मंडळांमध्ये उर्वरित सहा तालुके आहेत. दुष्काळ जाहीर होऊन आता तीन महिने होत आहेत.
दुसरीकडे दोन महिन्यापूर्वी सोलापूरसह राज्यातील २३ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे फळबागांचे नुकसान झाले. मात्र, अजूनही ना दुष्काळाची ना अवकाळीची मदत शेतकऱ्यांना मिळाली ही वस्तुस्थिती आहे. अशा कारणातूनच चिंतेतील शेतकऱ्यांसमोर ‘जगावे की मरावे’ असा प्रश्न निर्माण होतो.