पश्चिम महाराष्ट्रातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील १४ लाख आठ हजार वीज ग्राहकांकडे २५३ कोटी ३१ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील दोन लाख १२ हजारांहून अधिक ग्राहकांकडे देखील थकबाकी आहे.उन्हाळ्यामुळे विजेची मागणी वाढत असल्याने महावितरणने थकबाकीदारांवर कनेक्शन तोडण्याची कारवाई सुरू केली आहे. चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे, यासाठी पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी व रविवारी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत देखील सुरू ठेवण्यात येणार आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील दोन लाख १२ हजार ९६० ग्राहकांकडे ३६ कोटी पाच लाख रुपयांची थकबाकी आहे. वीजबिलांचा नियमित भरणा होत नसल्याने महावितरणची आर्थिक स्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी चालू व थकीत बिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे.