सिंहगड रोडवर राजाराम पूल ते फन टाईमपर्यंत उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू असून, आतापर्यंत 65 टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झाले आहे. सर्व कामे जूनअखेर पूर्ण करून जुलैच्या पहिल्या आठवड्यात हा उड्डाणपूल खुला होईल, अशा विश्वास महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी व्यक्त केला आहे.
तसेच घोरपडी येथील सोलापूर रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल मार्चअखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले. नरवीर तानाजी मालुसरे (सिंहगड रस्ता) रस्त्यावरील राजाराम पूल चौक ते फन टाईम थिएटर यादरम्यान अडीच किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले.
याचे काम 21 सप्टेंबर 2021 मध्ये सुरू करण्यात आले असून, काम मुदतीपूर्वीच पूर्ण करण्याचे नियोजन आहे. आतापर्यंत गोयल गंगा चौक ते विठ्ठलवाडी चौक या दरम्यान पिलरचे काम पूर्ण झाले असून, त्यावर गर्डर टाकण्याचे काम आनंदनगर ते विठ्ठलवाडी या दरम्यान सुरू आहे. तसेच राजाराम पूल चौकातील उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात असून, दोन्ही बाजूंनी चढण्यासाठी व उतरण्यासाठी रॅम्पचे काम हाती घेण्यात आले आहे. उड्डाणपुलाचे काम 65 टक्क्यांपेक्षा जास्त पूर्ण झाले असून, सर्व कामे जूनअखेर पूर्ण करून जुलैच्या पहिल्या आठवड्यात हा उड्डाणपूल खुला करण्यात येणार आहे.
घोरपडी गावातून मिरज व सोलापूरकडे जाणारे दोन रेल्वेमार्ग जातात.
दोन्ही रेल्वेमार्गावरील गेटवर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महापालिकेने दोन्हीही मार्गांवर उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन केले आहे. त्यातील सोलापूर रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाची काही किरकोळ कामे सोडली, तर सर्व कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे हा उड्डाणपूल मार्चअखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.