Ayodhya Ram Mandir : वनवासाच्या काळात प्रभू श्रीरामांचं वास्तव्य लाभलेलं ठिकाण म्हणजे, बहेतील रामलिंग बेट!

बहे : वनवासाच्या काळात प्रभू श्रीरामांचे वास्तव्य लाभलेलं ठिकाण म्हणजे बहे, अशी आख्यायिका बहेतील रामलिंग बेटाची आहे. यामुळे या परिसराला धार्मिक महत्त्‍व निर्माण झाले आहे. इस्लामपूरपासून १० किलोमीटरवर कृष्ण नदीच्या तिरी रामलिंग बेट आहे. प्राचीन काळात ही भूमी दंडकारण्य म्हणून ओळखली जाते.

रामलिंग बेट बहे गावच्या पश्चिमेला कृष्णा नदीपात्रात एक किलोमीटर लांब आणि अर्धा किलोमीटर रुंद खडकावर तयार झाले आहे. आज (ता. २२) रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पार पडत आहे. त्या पार्श्वभूमीवर बहेतील रामलिंग बेटावरही दिवसभर धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. अयोध्या येथील सोहळ्याचे थेट प्रसारण एलईडी स्क्रीनवर करण्यात येणार आहे.

रामलिंग बेटावर आज सकाळी सहा ते साडेआठ दरम्यान महापूजा आणि अभिषेक झाला. सकाळी नऊ ते ११ या वेळेत रामरक्षा पठण आणि रामनाम जप तर, दुपारी १२ वाजता महाआरती, पुष्पवृष्टी झाली. त्यानंतर आता गीत रामायण तसेच भावगीत आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम होणार आहे.

आख्यायिका

लंकेहून परत येताना प्रभू राम सीता व लक्ष्मण यांच्यासमवेत निघाले. येथे विश्रांतीला थांबले. वाळूचे लिंग तयार करून शंकराची पूजा केली, अशी आख्यायिका आहे. श्रीधर स्वामी यांनी लिहिलेल्या वाल्मिकी रामायणात उल्लेख आहे. हनुमान पहारा देत होते. नदीत पाणी कमी होते. काही वेळातच वातावरण बदलले. पाण्याची पातळी वाढू लागली. हनुमानाने दोन्ही बाहू पसरत रौद्र रूप धारण केले. या अडथळ्यामुळे नदी दुभागली.

या जागेच्या दोन्ही बाजूने नदी वाहत पुढे जाऊन पुन्हा नदी-पात्र एक झाले. अशाप्रकारे बेट निर्माण झाले, असे सांगितले जाते. ‘बाहू’ शब्दाचा अपभ्रंश होऊन बहे हे नाव प्रचलित झाले. येथे रामाने स्थापन केलेले म्हणून रामलिंग असे नाव झाले. इथे अस्तित्वात राम-सीता-लक्ष्मण यांचे मंदिर चौदाव्या शतकातील आहे. सोळाव्या शतकात समर्थ रामदासांनी पश्चिम महाराष्ट्रात स्थापन केलेला अकरावा मारुती इथेच आहे. मूर्तीचे हात असे बाहू पसरल्यासारखे असण्याचे कारण म्हणजे वर वर्णन केलेले महात्म्य सांगितले जाते.