बुधवारी वाळवा तालुक्यातील येडेमच्छिंद्रमधून फुटणार शेट्टींच्या प्रचाराचा नारळ!

क्रांतिसिंह नाना पाटील यांची जन्मभूमी असणाऱ्या येडेमच्छिंद्र (ता.वाळवा) येथून हातकणंगले लोकसभा मतदार संघातील स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार, माजी खासदार राजू शेट्टी बुधवारी म्हणजेच २४ एप्रिलपासून आपल्या प्रचाराचा प्रारंभ करणार आहेत. सलग चौथ्यांदा शेट्टी आपल्या प्रचाराचा प्रारंभ येथून करणार आहेत.

शक्तिप्रदर्शनाने शेट्टी यांच्या प्रचाराचा प्रारंभ करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, स्वाभिमानी पक्ष, स्वाभिमानी युवा आघाडी आणि स्वाभिमानी महिला आघाडीच्यावतीने तयारी सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी (ता.१६) शेट्टी यांनी कोल्हापुरात बैलगाडीतून मोठ्या शक्तिप्रदर्शनाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सर्वात आधी शेट्टी यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी विविध विधानसभा मतदारसंघांतील गावागावांत जात मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. आपली उमेदवारी कशासाठी, याबाबत ते मतदारांशी संवाद साधत आहेत. खासकरून साखर कारखानदारांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने झालेल्या ऊसदराच्या तोडग्यावर आपली बाजू ठासून सांगत आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने साखर कारखानदारांनी शंभर रुपये जादा देण्याचे ठरवले आहे. साखर कारखानदारांनी तसा प्रस्ताव शासनाकडे दिला असला, तरी लोकसभा निवडणुकीत आपल्याला श्रेय मिळेल, यासाठी शासनाने जाणीवपूर्वक हे प्रस्ताव प्रलंबित ठेवल्याचे ते शेतकरी आणि मतदारांना सांगत आहेत.