पुणे-सोलापूर व नगर जिल्ह्याला वरदान ठरलेले उजनी धरण सोमवारी मृत साठ्यात गेले असून, २०१५ नंतर पहिल्यांदाच एवढ्या लवकर मृत साठ्यात धरण गेल्याने शेती सिंचनासाठी फेब्रुवारी महिन्यात १० तारखेला पाणी बंद केले जाणार आहे.
त्यामुळे जलाशयावर अवलंबून असलेले शेती सिंचन अडचणीत आले आहे. उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर एप्रिल महिन्यात मृत साठ्यात जात असते. मात्र, यावर्षी जानेवारी महिन्यात मृतसाठा गाठला आहे. धरणात ६०.६६ टक्के पाणी पातळी झाली होती. रब्बी पिकांसाठी उजनीतून मुख्य कालवा, सीना-माढा उपसा सिंचन योजना, दहिगाव तसेच भीमा-सीना जोड कालव्यातून तर सोलापूर शहराला पिण्यासाठी उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्यात आले होते. १२ ऑक्टोबर रोजी धरणात एकूण ९६.१५ टीएमसी पाणीसाठा झाला होता. सर्वांत जास्त मृतसाठा ६३.६६ टीएमसी असलेले उजनी धरण आहे.
३२ टीएमसी पाणी आतापर्यंत वापर झालेला आहे. उजनी धरणात सोमवारी २२ रोजी एकूण ६३.६६ टीएमसी व उपयुक्त साठा ०.०० टीएमसी झाला आहे. धरण २०१५-१६ मध्ये १४.६७ टक्के भरले होते. त्यानंतर २०२३-२४ मध्ये फक्त ६०.६६ टक्के भरले होते. मात्र कालवा, नदी, बोगदा, सिंचन योजनांना दिलेल्या पाण्यामुळे उपयुक्त पाणीसाठा संपला आहे.
कालवा सल्लागार समितीच्या झालेल्या बैठकीनुसार शेतीच्या सिंचनासाठी रब्बीतील शेवटचे आवर्तन १० फेब्रुवारीपर्यंत आहे. शेतीला सिंचनासाठी त्यानंतर पाणी दिले जाणार नाही. पिण्याच्या पाण्यासाठी नदीतून मार्च व मे महिन्यांमध्ये पाणी सोडले जाणार आहे.