दोन हंगामाच्या मध्ये अगदी कमी कालावधीत येणारी पिके घेणे फायद्याचे ठरते. समजा आता आपल्या शेतामध्ये कपाशी लागवड केलेली आहे. खरिपाचे पीक संपल्यानंतर बरेच शेतकरी गहू, मका आणि कांद्या सारखे पिके घेतात.परंतु यामध्येअगदी कमी कालावधीत येणारी म्हणजे शॉर्ट टर्म पिके घेतली तर हातात चांगला पैसा फार कमी कालावधीत येतो. यामध्ये एक महत्वाचे शॉर्ट टर्म भाजीपाला पीक आहे ते म्हणजे उन्हाळी चवळी लागवड होय. आज आपण उन्हाळी चवळी लागवड पद्धत जाणून घेऊ.
उन्हाळी चवळीला लागणारे हवामान- हे उष्ण हवामानातील पीक असल्यामुळे कोरड्या आणि दमट अशा दोन्ही हंगामात चांगले येते. परंतु जर थंडीचे प्रमाण जास्त असेल तर हे पीक चांगले येत नाही. वीस अंशाच्या खाली तापमान चवळी पिकाला मानवत नाही. परंतु उष्ण तापमान म्हणजेच 40 अंश सेंटिग्रेड असेल तर हे पीक चांगले तग धरते आणि पाण्याचा चांगला पुरवठा असल्यास जोमाने वाढून उत्पन्न देखील भरपूर होते.
लागणारी जमीन- जमिनीची निवड या पिकाला जास्त प्रभावीत करत नाही. अगदी हलक्या ते मध्यम किंवाभारी जमिनीत देखील हे पीक उत्तम येते.परंतु पाण्याचा निचरा ज्या जमिनीत योग्य होत नाही अशी चिकन मातीची जमीन या पिकासाठी निवडू नये. पाण्याचा उत्तम निचरा होणारी कुठलीही जमीन आणि सहा ते साडे आठ आम्ल-विम्ल निर्देशांक असलेल्या सेंद्रिय पदार्थयुक्त जमिनीत हे पीक चांगले येते.
उन्हाळी चवळी ची पूर्व मशागत व पेरणी- लागवड करण्यापूर्वी जमीन चांगली नांगरून घ्यावीव कुळवाच्या पाळ्या देऊन भुसभुशीत करावी. पूर्वमशागत करताना हेक्टरी 10 ते 15 टन कंपोस्ट अथवा शेणखत टाकावे आणि चांगले मिसळावे. जर भाजीपाल्यासाठी हे पीक घ्यायचे असल्यास सरी वरंबे तयार करावेत. दोन रोपांमधील अंतर 15 सेंटिमीटर ठेवून वरंब्याच्या मध्यावर बी टोकावे. दोन सरीमधील अंतर 45 सेंटिमीटर ठेवावे.
जर आपण बाजारपेठेचा विचार केला तर हल्ली उच्च प्रतीच्या, कोवळ्या आणि एक सारख्या लांबीच्या शेंगांचे मागणी भरपूर असते त्यामुळे झुडूप वजा चवळी पिकाची लागवडगादी वाक्यांवर टोकण पद्धतीने करून पीक आणि खतांच्या मात्रा ठिबक सिंचन पद्धत वापरून द्यावे. यामुळे शेंगांची प्रत उत्तम मिळते उत्पादन देखील चांगले राहते. जमिनीची मशागत पूर्ण झाल्यानंतर गादीवाफे 60 सेंटिमीटर रुंद 30 सेंटिमीटर उंच आणि दोन गादी वाफ्यांमध्ये 40 सेंटीमीटर अंतर ठेवून तयार करावे. गादीवाफ्यावर लागवड करायची असल्यास दोन ओळींमध्ये करावीव दोन ओळीतील अंतर 45 सेंटिमीटर ठेवून दोन रोपांमध्ये 15 सेंटिमीटर अंतर ठेवावे.
उन्हाळी चवळी लागवडीचा हंगाम- लागवड साधारणतः उन्हाळी आणि खरीप या दोन्ही हंगामात करता येते परंतु हिवाळ्यामध्ये थंडी असल्याने चवळी पीक घेऊ नये. उन्हाळ्याची लागवड करायचे राहिल्यास फेब्रुवारी, मार्चमध्ये तर खरीप हंगामात जून आणि जुलै महिन्यात करावी.
आवश्यक खत व्यवस्थापन- खतांचे प्रमाण ठरवतांना जमिनीची सुपीकता तसेच कुठल्या हंगामात लागवड केली आहे, याचा विचार करणे गरजेचे आहे.तसेच माती परीक्षण करून घेणे गरजेचे आहे.परंतु साधारण विचार केला तर चवळी पिकाला हेक्टरी 50 किलो नत्र,75 किलो स्फुरद आणि 75 किलो पालाश देण्याची शिफारस करण्यात आली आहे. जमिनीची मशागत पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण स्फुरद आणि पालाशव अर्धी मात्रा नत्राची बियाणे पेरणीपूर्वी जमिनीत पेरून द्यावी.त्यानंतर पहिली खुरपणी झाल्यानंतर म्हणजे 20 ते 30 दिवसांनी राहिलेला अर्धा नत्राचा हप्ता द्यावा.
चवळी पिकाची काढणी आणि उत्पादन- लागवड केल्यापासून सहा ते आठ आठवड्यांनी झाडाला फुले येतातव त्यानंतर दोन आठवड्यांनी शेंगा तोडणीस तयार होतात. शेंगा भरदार आणि कोवळ्या तयार झाल्या की त्यांचे तोडणी करावी. खास दान्यासाठी पूर्ण पक्व झालेल्या शेंगा सुकल्यानंतर काढाव्यात.वरचेवर तोडणी करत राहिल्यास कोवळ्या शेंगा मिळतात.एकदा उत्पादन सुरू झाले तर सात ते आठ आठवड्यापर्यंत तोडणी चालते.हेक्टरी सुमारे 90 ते 120 क्विंटल हिरव्या शेंगांचे उत्पन्न मिळते. तर खरीप हंगामात 15 ते 20 क्विंटल तर उन्हाळी हंगामात 10 ते 15 क्विंटल प्रति हेक्टरी वाळलेल्या दाण्याचे उत्पादन मिळते.