मुश्रीफ मुख्यमंत्री झाले तरी मला फरक पडत नाही; समरजीत घाटगे

एकेकाळी जे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यावर टीका करायचे, जातीयवादी पक्ष म्हणून भाजपवर आरोप करायचे, त्याच भाजपच्या मेहरबानी आणि कृपेमुळे मंत्री हसन मुश्रीफ हे जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आहेत, अशी टीका भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

दरम्यान, श्री. मुश्रीफ हे मुख्यमंत्री जरी झाले तरी त्यांच्यासमोर मीच असणार आहे. त्यांची व माझी कागलमधील लढाई अटळ आहे, असेही घाटगे म्हणाले. मुश्रीफ यांची (ता. ४) जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी निवड झाल्यानंतर पत्रकारांनी घाटगे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

पालकमंत्री झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छाही, असे सांगून घाटगे म्हणाले, ‘पालकमंत्री म्हणून काम करताना त्यांनी भाजपने घालून दिलेल्या चौकटीतच काम करावे. यापूर्वीसारखा मनमानीचा कारभार चालणार नाही. पक्षाने घालून दिलेली चौकट पार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला तर त्यांच्यासमोर उभा राहून त्यांना चौकटीतच ठेवायचे काम मी करेन.’

घाटगे म्हणाले, ‘त्यांचा, माझा संघर्ष अटळ आहे. ते मुख्यमंत्री झाले तरी मला फरक पडत नाही. कागलचे सुराज्य होणे अटळ आहे. माझ्याकडे कुठलेही राजकीय पद किंवा राजकीय सत्ता नाही. त्याचाही मला काही फरक पडत नाही. माझ्या गुरूंचा आशीर्वाद हेच माझ्यासाठी मोठे राजकीय पद आणि सत्ता आहे. यापुढे मी आणखी जोमाने काम करणार आहे. त्याच जोमाने कार्यकर्त्यांना लोकांच्या सेवेत राहण्याचे आवाहन करणार आहे.

येत्या काळात मोठा विजय मिळवायचा आहे. शेवटी एवढेच म्हणतो, ‘जितना संघर्ष बडा होगा, जीत उतनीही शानदार होगी’.’ त्यांच्या सगळ्याच प्रश्‍नांची उत्तरे मी देणार नाही. बदल हवा तर आमदार नवा हेच ध्येय डोळ्यांसमोर ठेवून मी व माझे कार्यकर्ते काम करत राहू, असेही घाटगे म्हणाले.

‘त्यांनी’ गुरूच बदलला

काहींनी सत्ता आणि पदासाठी गुरूच बदलले, हा त्यांच्या व माझ्यातील फरक. गुरूंच्या आशीर्वादाची ताकद कागल मतदारसंघात मी दाखवून देणार आहे, असा इशाराही घाटगे यांनी दिला.