आमच्या भागात गेले आठ दिवस कचरा गाडी आली नाही, ही तक्रार करण्यासाठी आता वाव राहणार नाही. कारण, शहरामध्ये कचरा टाकणाऱ्याच्या टोपल्यांना आणि बाहेर संरक्षक भिंतीवरही क्यूआर कोड लावण्यात येणार आहेत.
कचरा उठाव करणाऱ्या गाडीचालक किंवा मदतनिसांना बाहेर लावलेला क्यूआर कोड स्कॅन करणे बंधनकारक राहणार असून, त्या माध्यमातूनच या गाड्यांवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.कोल्हापूर शहराची वाढ झपाट्याने होत असून, सदनिकांची संख्याही वाढत आहे. परंतु अनेक ठिकाणांहून आमच्याकडे गेले चार-पाच दिवस कचरा गाडीच आली नाही, अशा तक्रारी येतात.
बहुतांशी ठिकाणी कचरा गोळा करून ठेवण्यासाठी सोयही नसते आणि त्याची दुर्गंधीही सुटते. यावरून अनेकदा वादाचेही प्रसंग निर्माण झाले आहेत. राज्यातील अनेक शहरांमधील हा प्रश्न लक्षात घेऊन नगरविकास विभागानेच याबाबत राज्य पातळीवरून निविदा काढली आहे.
कचरा संकलनासाठी गाड्या वेळेवर गेल्या आहेत की नाही, कुठले कचरा संकलन केले आहे आणि कुठले केलेले नाही, कोणती गाडी नादुरुस्त झाली आहे, या सगळ्याची इत्थंभूत माहिती या क्यूआर कोडच्या माध्यमातून महापालिका प्रशासनाला समजणार आहे. त्यामुळे आमच्याकडे कचरा गाडी आली नाही, या तक्रारीला आळा बसेल आणि ही सेवा अधिक प्रभावी होईल, असे महापालिका प्रशासनाला वाटते.