व्हीनस कॉर्नर परिसरातील एका बारमध्ये मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मद्यप्राशन केल्यानंतर संशयित तरुण रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना शिवीगाळ करीत होते.
याचवेळी मध्यवर्ती बस स्थानकाहून बोंद्रेनगरकडे निघालेल्या केएमटी बसवर यातील अभिषेक घोडकेने रस्त्यात पडलेला मोठा दगड उचलून भिरकावला. यामध्ये दर्शनी काच फुटली. अचानक घडलेल्या प्रकाराने चालक-वाहकासह प्रवासीही भयभीत झाले होते.
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी तातडीने संशयितांना शोधण्याच्या सूचना केल्या होत्या. शाहूपुरी पोलिसांनी या घटनेनंतर बारमध्ये बसलेल्या संशयितांबाबत मालकाकडे चौकशी केली; पण त्या तरुणांविषयी त्यांना कोणतीच माहिती नव्हती. मात्र, त्यापैकी एकाने बिल भागविण्यासाठी ऑनलाईन पेमेंट केल्याची माहिती समोर आल्याने याआधारे एकाला बुधवारी रात्री ताब्यात घेतले.
गुन्ह्यातील अन्य संशयितांची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळताच त्यांनी अन्य तिघांना गुरुवारी पकडून आणले. सायंकाळी व्हीनस कॉर्नर चौकातून तिघांना पायी फिरविण्यात आले. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. कारवाईत एलसीबीचे संतोष बरगे, वैभव पाटील, प्रवीण पाटील, महेंद्र कोरवी, कृष्णात पिंगळे, लखन पाटील, शुभम संकपाळ यांनी भाग घेतला.
मद्यधुंद अवस्थेत दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने व्हीनस कॉर्नर चौकात केएमटीसह वाहनांवर दगडफेक करण्याचा प्रकार चार संशयितांकडून १४ जानेवारीला घडला होता.पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आधारे या चारही संशयितांना काल पकडले. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही सहभाग आहे. शाहूपुरी पोलिसांनी सायंकाळी संशयितांना घटनास्थळी फिरवले.
अभिषेक मंगेश घोडके (वय २६, रा. राजारामपुरी), आसिफ अमनुल्ला नायकवडी (३०, रा. इंगळी, हातकणंगले), ओंकार जगन्नाथ चौगुले (२२, रा. पाथरूट गल्ली, सायबर चौक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत, तर इयत्ता नववीत शिकणारा चौथा साथीदार अल्पवयीन असून त्यालाही ताब्यात घेण्यात आले.
.