सागली शहर आणि जिल्ह्यातून वाहणारी कृष्णा नदी पुन्हा कोरडी पडली आहे. यामुळे सांगलीतील जनता संतप्त झाली असून, आज जलसंपदा विभागाच्या कारभाराविरोधात कोरडय़ा पात्रात उतरून आंदोलन करण्यात आले.यावेळी सांगली जिह्याच्या हक्काचे पाणी कृष्णेत सोडून ती बारमाही वाहती ठेवा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी शेकडो नागरिकांसह विविध सामाजिक संस्थांनी सांगली बंधाऱयावर निदर्शने केली.
या आंदोलनाचे नेतृत्व कृष्णा नियंत्रण नागरी कृती समितीचे निवृत्त अभियंता विजय कुमार दिवाण, प्रभाकर केंगार, सतीश साखळकर, ड़ॉ मनोज व्होरा, मनोज पाटील, प्रदीप वायचळ, सर्जेराव पाटील, हणमंतराव पवार यांनी केले.आंदोलकांनी म्हटले, सध्या कोयना धरणामध्ये उपयुक्त पाणीसाठा 71 टीएमसी आहे. कोयना धरणातून विद्युत निर्मितीसाठी 49 टीएमसी पाणी शिल्लक राहत आहे. त्यापैकी कृष्णा नदीसाठी 22 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. तसेच हक्काचे धोम, उरमोडी, तारळा या धरणांमधून टेंभू व ताकारी या योजनांसाठी मंजूर असलेले व राखून ठेवलेले 12 टीएमसी पाणी शिल्लक आहे. असे एकूण हक्काचे 34 टीएमसी पाणी सांगली जिह्यासाठी उपलब्ध आहे.
वरील सर्व धरणांत जून अखेर म्हणजे 160 दिवस सांगली शहर व जिह्याला पाणी पुरेल एवढा पाणीसाठा सध्या धरणात आहे. परंतु काही झारीतील शुक्राचार्य मंडळी कृष्णा तीरावरील लोकांना निष्कारण वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत आहेत. जर पुन्हा नदी कोरडी पाडण्याचा खेळ झाला, तर अतिशय तीव्र आंदोलन केले जाईल आणि त्याच्या परिणामांची जबाबदारी ही जलसंपदा विभागाच्या अधिकाऱयांवर राहील, असा इशारा यावेळी देण्यात आला.