जॉर्डनमध्ये अमेरिकेच्या तळावर मोठा हल्ला झाला आहे. सीरीयाच्या सीमेजवळ अमेरिकेचा हा तळ आहे. या ड्रोन हल्ल्यात तीन अमेरिकन सैनिक ठार झाले आहेत. 10 पेक्षा जास्त सैनिक जखमी झालेत. ऑक्टोबरमध्ये इस्राइल हमास युद्धाला सुरुवात झाल्यानंतर अमेरिकन सैन्यावर झालेला हा आतापर्यंतच सर्वात मोठा हल्ला आहे. कारण यात अमेरिकेचे तीन सैनिक मारले गेले आहेत. आतापर्यंतचा इतिहास पाहिला, तर अमेरिकन सैन्य तळावर हल्ला झाल्यानंतर लगेच प्रत्युत्तर दिलं जातं. यावेळी अमेरिकेचे सैनिक मारले गेलेत, त्यामुळेच अमेरिकेच प्रत्युत्तरही तितकच मोठ असणार. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी बदला घेण्याचा संकल्प बोलून दाखवलाय.
ज्यो बायडेन यांनी या हल्ल्यासाठी इराणच समर्थन प्राप्त असलेल्या दहशतवादी गटाला जबाबदार धरल आहे.“आम्ही वेळ आणि ठिकाण ठरवून हल्ल्याला जबाबदार असलेल्यांना धडा शिकवू” असं अमेरिकेने म्हटलं आहे. आता अमेरिकेच्या स्ट्राइकची जागा काय असेल? या बद्दल कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. अमेरिका थेट इराणमध्येही घुसूनही स्ट्राइक करु शकते. असं झाल्यास मध्य आशियात तणाव आणखी वाढेल. इराणने या हल्ल्याशी आपला संबंध फेटाळला आहे. आमचा काहीही संबंध नाही, असा इराणने दावा केलाय. ‘आमच्यावरील आरोप आधारहीन आहेत’ असं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नासेर कान्नानी यांनी सांगितलं.