कासारवाडी येथे गव्यांचा कळप!

सादळे-मादळे (ता. करवीर), कासारवाडी (ता. हातकणंगले) या परिसरात वीस ते पंचवीस गाव्यांचा कळप पुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. जोतिबा डोंगरावर दिसणारा कळप पोहाळे जंगलाच्या बाजूस खोरीलगत निदर्शनास आला. दोन वर्षांपासून सादळे-मादळे, कासारवाडी परिसरात कळपाने गवे या परिसरात दाखल झाले आहेत. या महिन्यात गवे या परिसरात वारंवार येत आहेत.

कासारवाडी, मानपाडळे, सादळे-मादळे, पोहाळे, गिरोली डोंगर येथे गवे तळ ठोकून आहेत. सध्या या भागात पिके कशीबशी जगवण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. जोतिबा डोंगरावर दिसणारा कळप सकाळी दहाच्या सुमारास मनपाडळे जंगलातून मादळे येथून पोहाळे जंगलाच्या बाजूस खोरीलगत निदर्शनास आला. गव्यांचा कळप वारंवार येऊन पिकांचे नुकसान करत असल्याने शेताभोवती झटका यंत्र लावण्याची मागणी कासारवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने वन विभागाकडे केली आहे. पण अद्याप यंत्र मिळालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.