दिघंचीतील चोऱ्यांची तक्रार आमदारांकडे…..

अलीकडच्या काळात चोरीच्या घटना मध्ये खूपच वाढ होत आहे. दिवसाढवळ्या चोर आपले हात साफ करतानाचे चित्र पहायला मिळत आहे. दिघंची (ता. आटपाडी) येथे गेल्या काही दिवसांत एकाच रात्रीत तीन ते चार ठिकाणी मोठ्या घरफोड्या
झाल्या. त्याशिवाय अनेक छोट्यामोठ्या चोऱ्याही झाल्या. मात्र त्यांचा तपास लावण्यात आटपाडी पोलिस अपयशी ठरले आहेत.

यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते राजीव गंगाधर होनराव यांनी आमदार अनिल बाबर यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, चोऱ्या, घरफोड्यामध्ये लाखो रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. ग्रामस्थांत दहशत निर्माण झाली होती. पोलिसांत तक्रारी गेल्यानंतर पंचनामे झाले. ग्रामस्थांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील छायाचित्रण पोलिसांत सुपुर्द केले. पण त्यानंतरही गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे चोरट्यांचा बंदोबस्त होणार की नाही?असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. प्रशांत मोरे, कुमार टिंगरे, रामराव मोरे, चांद शेख तसेच राजीव होनराव यांच्या घरी चोऱ्या झाल्या होत्या. ग्रामस्थांनी अधीक्षकांचीही भेट घेतली आहे. आता आमदार बाबर यांनीच पोलिसांना सक्त सूचना द्याव्यात अशी विनंती होनराव यांनी केली आहे.