पाणीदार आमदार अशी ओळख असलेले शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं आज आकस्मित निधन झालं. ते 74 वर्षांचे होते. सांगली जिल्ह्यातील खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून ते आमदार होते. न्यूमोनिया झाल्याने काल दुपारी अनिल बाबर यांना सांगलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सांगलीतील खानापूर तालुक्यातील गार्डी या गावी अनिल बाबर यांचा जन्म झाला. त्यांनी सरपंच पदापासून राजकारणाच्या विविध पायऱ्या पादाक्रांत केल्या. जिल्हा परिषद सदस्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. जुन्या पिढीसोबतच नवीन पिढीशी ते सहज मिसळून जातात. गेल्यावर्षी झालेल्या राजकीय उलथापालथीत ते अचानक नॉट रिचेबल झाले आणि शिंदे गटात ते सहभागी झाले.अलीकडेच सांगलीत झालेल्या एका विशेष कार्यक्रमाला अनिल बाबर उपस्थित होते. शरद पवारही त्या कार्यक्रमाला आलेले.
अनिल बाबर त्या ठिकाणी आले, त्यावेळी जयंत पाटील यांनी त्यांना बसण्यासाठी जागा दिली. 7 जानेवारी 1950 रोजी अनिल बाबर यांचा जन्म झाला. त्यांची राजकीय कारकीर्द तितकीच मोठी आहे. 1972 साली वयाच्या 22 व्या वर्षापासून त्यांच्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली. जिल्हा परिषद सदस्य ते आमदार असा त्यांचा प्रवास होता. सर्वातआधी ते 1990 साली आमदार म्हणून ते विधानसभेवर निवडून गेले. 1982 ते 1990 खानापूर पंचायत समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं.आमदार एकनाथ शिंदे यांचे विश्वासू अशी त्यांची ओळख होती. सांगली जिल्ह्यातील शिंदे गटाचे ते एकमेव आमदार होते.
संघर्ष करुन त्यांनी इथपर्यंतचा प्रवास केला. त्यांच्या अकाली निधनाच्या बातमीने परिसरात आणि सांगली जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. राजकारणात सक्रीय असताना त्यांनी साखर कारखाने, जिल्हा बँकेवरही पद भूषवली.पश्चिम महाराष्ट्रात अनिल बाबर यांची पाणीदार आमदार अशी ओळख आहे. खानापूर-आटपाडी हा मतदारसंघाला दुष्काळाचा शाप आहे. या भागासाठी जायकवाडी प्रकल्पातून पाणी खेचून आणता येईल, यासाठी ते कायम प्रयत्नशील राहिले. त्यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षाकडून त्यांनी यासाठी जोरकस प्रयत्न केले. या योजनेला त्यांनी टेंभू योजना असे नाव दिले.