गावोगावी अनेक नवनवीन प्रकारचे उपक्रम राबविले जातात. जेणेकरून त्याचा लाभ हा सर्वांनाच होईल. असाच एक उपक्रम हातकणंगलेत राबवला गेला. कोणत्याही राजकीय नेत्याकडे वर्गणी न मागता, तसेच शासनाचा रुपयाचाही निधीही न घेता येथील मराठा समाजाच्या युवकांनी प्रत्येक मराठा घराच्या उंबऱ्याला ११ रुपयांपासून १०९६ रुपयाची वर्गणी बसवून ती गेली २३ वर्षे जमेल तशी गोळा करून २५ लाखांचे मराठा मंदिर उभारले आहे. या इमारतीमुळे मराठा बांधवांना हक्काची जागा उपलब्ध झाली आहे.
मंदिरासाठी समाजाचे अध्यक्ष दयासागर मोरे, पंडित निंबाळकर, सुभाष चव्हाण, सागर लुगडे, प्रकाश मोरे, संतोष मोरे, संदीप पोवार, प्रवीण कदम, राजेंद्र वाडकर आदींनी प्रयत्न केले. मराठा समाजाच्यावतीने दरवर्षी विद्यार्थी, महिला, आर्थिक दुर्बल घटकांसाठी वेगवेगळे कार्यक्रम तसेच स्पर्धा आयोजित केल्या जातात. योजनांची माहिती देण्यासाठी कार्यक्रम आखले जातात. या सर्व कार्यक्रमांसाठी हक्काची जागा मिळाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.