सध्या प्रत्येक पक्ष लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेला आहे. आपापल्या परीने त्यांची मोर्चेबांधणी सुरु झालेली आहे.
सोलापूर लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी आ. प्रणिती शिंदे तर माढा लोकसभेसाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते- पाटील यांचे नाव महाविकास आघाडीकडून निश्चित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी आ. प्रणिती शिंदे हेच उमेदवार असतील, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी अनेकवेळा सांगितले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी कडून आ. शिंदे यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे.
त्यात आता माढा लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेस जिल्हाध्यक्ष मोहिते-पाटील यांचे नाव निश्चित झाल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माढ्याची आपली जागा सोडणार का? याची चर्चा जिल्ह्यात रंगत आहे. माढा लोकसभा हा राष्ट्रवादी पक्षाचा बालेकिल्ला होता. मात्र या बालेकिल्ल्याला भाजपाने २०१९ मध्ये सुरुंग लावला. त्यात आता अजित पवार गट भाजप सोबत गेल्यामुळे भाजपाची येथील ताकद वाढली आहे.
त्यामुळे शरद पवार गट राष्ट्रवादीची जागा काँग्रेस पक्षाला सोडणार की आपला उमेदवार उभा करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे. सध्या काँग्रेस जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांचे लोकसभेसाठी नाव निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र पक्षाकडून अद्यापही त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली नाही. पण या दोन्ही नावांचीच चर्चा राजकीय वर्तुळातून होत आहे.