बंद घरामध्ये चोरीच्या घटना होतातच. पण चक्क कलबुर्गी-कोल्हापूर एक्स्प्रेसमध्ये चोरट्यांनी दागिन्यांवर डल्ला मारलेली घटना उघडकीस आली आहे. कलबुर्गी-कोल्हापूर एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या कोल्हापूर येथील सराफाच्या आठ लाख ४१ हजार रुपयांच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. साडेतीन लाख रुपयांची रोख रक्कम मात्र बॅगेत सापडली आहे. याप्रकरणी भारत रामचंद्र हसुरकर यांनी कुर्डूवाडी रेल्वे पोलिसांत चोरीची तक्रार दिली आहे.
हसूरकर यांच्या तक्रारीबाबत रेल्वे पोलिसांनी तातडीने हालचाल करीत रेल्वे मिरजेत आल्यानंतर साडेतीन लाख रोख रक्कम गाडीतून हस्तगत केली. बॅगेतील साडेआठ लाखांचे सोने मात्र चोरट्यानी लंपास केले. कोल्हापूर येथील सराफ भारत रामचंद्र हसूरकर (रा. कोल्हापूर) हे सोनार व्यवसायानिमित्त कलबुर्गी येथे गेले होते. बुधवारी सकाळी कलबुर्गी-कोल्हापूर एक्स्प्रेसने ते परत येत असताना प्रवासात चोरीची घटना घडली. हसूरकर प्रवासादरम्यान कुर्डूवाडी येथे चहा पिण्यासाठी गाडीतून उतरल्यानंतर एस वन बोगीतील सीटवरून अज्ञात चोरट्याने त्यांची सोने व रोख रक्कम असलेली बॅग लंपास केली.