मंगळवेढ्यातील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतील १९ गावांमध्ये शेतीला टँकरचे विकतचे पाणी सुरू आहे, अशी बातमी होती. यामुळे आमदार समाधान आवताडे यांनी १९ गावांची बैठक येत्या ३ फेब्रुवारीला आयोजित केली आहे. म्हैसाळ लाभक्षेत्रातील गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याने या योजनेत येणाऱ्या १९ गावांतील सुमारे सहा हजार हेक्टर क्षेत्राला पाण्याची गरज निर्माण झाली होती. पण पाणी वाटप नियोजनात गडबड झाल्याने या गावांना पाणी मिळत नव्हते.त्यामुळे या मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांनी या भागातील शेतकऱ्यांच्या अडचणीची दखल घेऊन या योजनेतील १९ गावांची बैठक सलगर बुद्रूक येथे घेण्याचे ठरवले आहे.
या बैठकीसाठी सांगली पाटबंधारे विभागातील या योजनेत काम करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांसमवेत ही बैठक पार पडणार आहे, असे पत्र आमदार आवताडे यांनी उपविभागीय अधिकारी मंगळवेढा यांना काढले आहे. त्यामुळे आमदार आवताडे यांनी ही बैठक लावल्याने म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील गावातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतील लाभक्षेत्रातील माझ्या मतदार संघात दक्षिण मंगळवेढ्यातील १९ गावांमधील सहा हजार क्षेत्र ओलिताखाली आले आहे. पाण्याची मागणी होताच अधिकारी वर्गाला जाब विचारून या गावांना पाणीपुरवठा सुरू केला आहे. या योजनेतून पाणी वाटपात या गावांवर अन्याय होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. त्यामुळे मतदार संघातील शेतकऱ्यांच्या समस्या ऐकण्यासाठी व त्यावर मार्ग काढण्यासाठी या बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले प्रश्न मांडावेत असे आवाहन समाधान आवताडे यांनी केले आहे.