सांगोलकर नक्कीच मशालीचा प्रकाश संबंध तालुक्यात पसरवतील….

शिवसेना पक्षाविषयी कांही राजकीय नेत्यांनी घेतलेली वेगळी भूमिका महाराष्ट्राला अजिबात आवडली नाही.महाराष्ट्रात व प्रामुख्याने सोलापूर जिल्ह्यातील अंधःकार जाळण्यासाठी मी आज दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या हातात सांगोला विधानसभेची उमेदवारी जाहीर करुन शिवसेनेची धगधगती मशाल देत आहे. दीपकआबा जिल्ह्यातील अंधःकार दूर करुन विकासाचा नवीन दीपक घेऊन जिल्ह्याच्या राजकारणात नक्कीच उदयाला येतील,असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

यावेळी बोलताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, २०१९ मध्ये झालेल्या सांगोला विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार म्हणून सांगोलकरांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांनी भूमिका घेतली. त्यांना घडविण्यासाठी मी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या हातात निष्ठेची आणि परिवर्तनाची मशाल देत आहे.मला विश्वास आहे की, सांगोलकर नक्कीच या मशालीचा प्रकाश संबंध तालुक्यात पसरवतील व विरोधकांना कायमस्वरुपी घरी बसवतील, असा विश्वास व्यक्त करत आगामी विधानसभा निवडणुकीत दीपकआबा साळुंखे-पाटील यांची महाविकास आघाडीतून मशाल या चिन्हावर सांगोला विधानसभेचा उमेदवार म्हणून अधिकृतपणे घोषणा केली.