उपसा सिंचन योजनेला 883 कोटी मंजूर! आमदार शहाजीबापू पाटील

सांगोला तालुक्यातील वंचित 12 गावांसाठी वरदायिनी असलेल्या बहुप्रतिक्षित स्व. बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेला सोमवारी (ता. 5) रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली.

सुमारे ३९ हजार एकर क्षेत्राला या योजनेचे पाणी मिळणार असून यासाठी ८८३ कोटी रुपयांच्या खर्चाच्या योजनेला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता मिळाल्याची माहिती मुंबईहून आमदार शहाजी पाटील यांनी दिली.सन १९९७ मध्ये मूळ मंजूर असलेली ७३.५९ कोटी रुपयांच्या सांगोला उपसा सिंचन योजनेच्या कामाला सन २००० साली प्रशासकीय मान्यता मिळाली होती.

त्यावेळी १६ हजार एकर क्षेत्र यामध्ये समाविष्ट होते परंतु सन २००० ते २०१९ या काळामध्ये सदर योजनेच्या कोणत्याही कामाला सुरुवात न झाल्याने मंजुरी नंतर पाच वर्षांनी सन २००६ साली याची प्रशासकीय मान्यता व्यपगत झाली.

आमदार झाल्यानंतर शहाजी पाटील यांनी सन २०२० सालापासून या कामाचा पाठपुरावा केला व नव्याने १२ वंचित गावे व सांगोला शाखा कालव्यावरील उच्च भागामध्ये असणारी गावे यासाठी प्रस्ताव तयार करून सुमारे ३९ हजार एकर क्षेत्राचा यामध्ये समावेश केला.

योजना पूर्ण करण्यासाठी ८८३ कोटी इतक्या खर्चाच्या अंदाजपत्रकाला राज्य तांत्रिक सल्लागार समितीने मान्यता दिली असून काल सोमवारी (ता. 5) रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार शहाजी पाटील यांनी दिली.