हातकणंगलेत दुचाकींची समोरासमोर धडक! दोघेजण गंभीर जखमी

अलीकडच्या काळात अनेक अपघाताच्या प्रमाणात वाढ झालेली आपणाला पहायला मिळतेच आहे. यामुळे अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. सांगली-कोल्हापुर मार्गावर हातकणंगले पंचायत समितीच्या समोरील अर्धवट पुलावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होवुन झालेल्या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. उमेश पवार (रा.सांगली) व सीमा कांबळे (रा. मौजे वडगांव, ता. हातकणंगले) अशी जखमींची नांवे असून दोघांनाही सांगली सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अपघातानंतर शिरोली एमआयडीसीचे सहा. पोलीस निरीक्षक पंकज गिरी व सामाजिक कार्यकर्ते सागर पुजारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तात्काळ रुग्णवाहिकेत घालून सनी भवाण यांनी प्राथामिक उपचाराकरिता हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णांची परिस्थिती गंभीर असलेने त्यांना सांगली सिव्हील हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. जखमी सीमा कांबळे यांचे पती भास्कर कांबळे किरकोळ जखमी झाले. मात्र याबाबत रात्री उशिरापर्यंत एवढा मोठा अपघात होवून सुद्धा हातकणंगले पोलीस स्टेशनमध्ये कसलीही माहिती नसल्याचा निर्वाळा संबंधित ठाणे अंमलदारानी दिला.