हातकणंगले लोकसभा निवडणूक लढवणार…….

सध्या लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीत प्रत्येक पक्ष आपापली मोर्चेबांधणी करताना दिसत आहेतच. जयसिंगपूर येथील प्रा. परशुराम तम्माणा माने यांनी हातकणंगले लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. समाजातील उपेक्षित, वंचित तसेच युवक वर्गांना सोबत घेऊन ही निवडणूक लढवली जाईल, असा ठाम निर्णय प्रा. परशुराम माने यांनी व्यक्त केला आहे. प्रा. माने यांनी लोकसभेचे रणशिंग फुंकले आहे. प्रा. परशुराम माने म्हणाले, हातकणंगले लोकसभा मतदार संघातील
अनेक समस्या मागील २५ वर्षांपासून प्रलंबित आहेत.

प्रामुख्याने युवकांचे अनेक प्रश्न आहेत. बेरोजगारीची समस्या आहे. समाजातील मध्यमवर्गीय, नोकरदार, शेतकरी, मजूरी करणारे घटक अशा अनेकांना न्याय मिळाला नाही. तसेच हातकणंगले लोकसभा मतदार संघात अनेक पायाभूत आणि मुलभूत विकासाची कामे झालेली नाहीत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर सर्वच घटकांना न्याय मिळावा आणि विकासात्मक कामे अधिक गतीशीलपणे झाली पाहिजेत. या विचाराने आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

यासंबंधी मागील काही काळापासून जयसिंगपूर, हुपरी, हेरले, आळते, बोरपाडळे, पन्हाळा, बत्तीसशिराळा, रेठरे बुद्रुक, साखराळे, अतिग्रे, कुंभोज, चिपरी अशा अनेक गावांमध्ये प्रा. परशुराम माने यांनी युवक, शिक्षक, प्राध्यापक यांच्या बैठका घेतल्या आहेत. अशा सर्वच ठिकाणी झालेल्या बैठकांमध्ये प्रा. माने यांना लोकसभेची निवडणूक लढवावी, असा आग्रह सर्वांनीच केला आहे. या पार्श्वभूमीवर प्रा.माने यांनी लोकसभा लढवण्याचा निश्चय केला आहे. आजी आणि माजी खासदार यांच्यासंबंधी हातकणंगले लोकसभा मतदार संघात प्रचंड मोठी नाराजी आहे. त्यामुळे प्रा.परशुराम माने यांना लोकसभा निवडणुकीसाठी चांगला प्रतिसाद मिळेल, असे संकेत आहेत.