साखर कारखान्यांनी गेल्या हंगामात गाळप झालेल्या उसाचे ४०० रुपये द्यावेत यासाठी आता स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना २२ व्या ऊस परिषदेच्या पार्श्वभूमीवर आज पासून २२ दिवस आक्रोश पदयात्रा सुरु केली आहे. आजपासून शिरोळ मधील दत्त कारखाना येथून सुरू झालेलं ही पदयात्रा कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ कारखान्यांवर जाणार असून राजू शेट्टी स्वतः २२ दिवस तब्बल ५२२ किलोमीटर चालत जाणार आहेत. तसेच गेल्या वर्षीचे ४०० रुपये दिल्याशिवाय साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही, असा इशारा ही यावेळी देण्यात आला आहे. राजू शेट्टींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील जरी टीका केली असून साखर उद्योग क्षेत्रासंदर्भातले सर्व निर्णय हे उपमुख्यमंत्री अजित पवारच घेत आहेत. शिंदे आणि फडणवीस हे केवळ म म् म्हणत आहेत, अशी टीका ही त्यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी सांगावं अजितदादा सांगतील तेच आमचे धोरण :
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे. साखर उद्योग क्षेत्रासंदर्भातले सर्व निर्णय हे उपमुख्यमंत्री अजित पवारच घेत आहेत. हे आता स्पष्ट झालेलं आहे. आज गाळप हंगामातील महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत आहे. पण, प्रत्यक्षात अजित पवार यांनी जे ठरवलेलं आहे. तेच होणार आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केवळ म म् म्हणत आहेत. राज्यातील साखर कारखान्याचा गळीत हंगाम कधी सुरू करायचा हे अजितदादांनी ठरवून तारीख दिलेली आहे. जर अजित पवार सांगतील तेच जर होणार असेल तर आता मुख्यमंत्र्यांनी सांगावं अजितदादा सांगतील तेच आमचे धोरण असेल अशी टीका शेट्टी यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कारखानदारांच्या दबावाखाली आहेत. याचा वारंवार मला अनुभव आलेला आहे. एक रकमी एफआरपी चा निर्णय होऊन आठ महिने झालेले आहेत याचे मिनिट्स देखील माझ्याकडे आहेत. याच्यानंतर तीन वेळा मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटलो.त्यांनी लवकरच शासन निर्णय काढू असं सांगितलं होतं मात्र कारखानदारांच्या दबावाखाली त्यांनी शासन निर्णय काढलेला नाही. आणि आता कारखानदार म्हणतायेत मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला. मात्र शासन निर्णय झालेला नाही त्यामुळे आम्ही तुकड्या तुकड्यानेच एफआरपी देणार. याचाच अर्थ या मुख्यमंत्र्यांचं साखर कारखानदार ऐकत नाहीत असे होते असे ही शेट्टी यावेळी म्हणाले आहेत.
२२ व्या ऊस परिषदेच्या पार्श्वभूमीवर २२ दिवस आत्मक्लेष:
काही दिवसांपूर्वी साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढत साखर कारखान्यांनी २ ऑक्टोबरच्या आत गेल्या वर्षीच्या ऊसाला दुसरा हप्ता चारशे रुपये द्या असे मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली होती. मात्र, या मागणीकडे साखर कारखान्यांनी दुर्लक्ष केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आता आक्रमक झाली आहे. या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून साखर कारखानदारांच्या दारात जात आक्रोश मोर्चा काढत असून १७ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर दरम्यान कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील कारखानदारांच्या दारात पायी चालत जात जात आहेत. मागण्या पूर्ण होईपर्यंत गाळप हंगाम सुरू होऊ देणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. दरम्यान या आंदोलनात मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी झाले असून ठिकठिकाणी राजू शेट्टी यांचा जंगी स्वागत केलं जातं आहे.
कसं असणार आहे आंदोलन?:
आंदोलनाची सुरुवात आज पासून शिरोळ येथील दत्त सहकारी साखर कारखाना येथून सुरू झाली आहे. गुरूदत्त, जवाहर, शाहू, सदाशिवराव मंडलिक साखर कारखाना, संताजी घोरपडे, बिद्री, भोगावती, कुंभी कासारी, दालमिया, वारणा, बांबवडे, चिखली, निनाईदेवी, वाटेगाव, कृष्णा, राजारामबापू, जी डी बापू लाड, वाळवा हुतात्मा, सांगली सहकारी, सर्वोदय, शरद, पंचगंगा साखर कारखाना करत तब्बल ५२२ किलोमीटर अंतर चालून ही यात्रा ०७ नोव्हेंबर रोजी थेट जयसिंगपूर येथील २२ व्या ऊस परिषदेला पोहोचणार आहे.