मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या रविवारी (दि. १८) कोल्हापूर दौऱ्यावर येत असून या माध्यमातून शिवसेना शिंदे गट जोरदार राजकीय शक्तिप्रदर्शन करणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या पक्षाच्या या अधिवेशनासाठी कोल्हापूर निवडले आहे. एकत्रि शिवसेना असताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेच्या प्रचाराची सुरुवात कोल्हापुरातून अंबाबाईच्या दर्शनाने करत असत. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही प्रथा सुरू ठेवली आता मुख्यमंत्री शिंदे यांनीही पक्षाच्या अधिवेशनासाठी कोल्हापूरचीच निवड केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन कोल्हापुरात होत असून त्यानिमित्त शिंदे शिवसेनेचे राज्यभरातील सर्व नेते कोल्हापुरात येणार आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा जागांचा आढावा घेणार आहेत.
कोल्हापूर आणि हातकणंगले या जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा शिवसेना शिंदे गटाकडे आहेत. या दोन्ही जागा जिंकण्याबरोबरच महाराष्ट्रातून महायुतीला बळ देण्यासाठी आणि भाजपच्या नेत्यांनी म्हटल्याप्रमाणे ४८ पैकी ४२ जागांवर विजय मिळविण्याचे आव्हान महायुतीसमोर आहे.
शिंदे शिवसेनेकडून विद्यमान खासदार संजय मंडलिक व धैर्यशील माने यांचीच नावे प्रामुख्याने घेतली जात आहेत. ज्यावेळी या खासदारांनी मूळ शिवसेनेचा त्याग करून शिंदे शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळी त्यांनी आपल्या उमेदवारी बाबतचा मुद्दा भाजपनेत्यांपुढे सोडवून घेतल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे या दोघांच्या उमेदवारी पक्की असल्याचे सांगितले जाते. मात्र महाविकास आघाडीकडून मिळणारे आव्हान पाहता शिंदे हे आव्हान परतविण्यासाठी कोणता राजकीय फॉर्म्युला वापरणार हे त्यांच्या दौऱ्यानंतरच स्पष्ट होणार.