अनेक तालुक्यात दुष्काळ जाहीर झालेला आहे. राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या विविध सवलतीं बाबत दोन वेळा जीआर काढून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. केवळ खरीप पीक कर्जाचे पुनर्गठन न करता सर्व प्रकारच्या पीक कर्जाचे पुनर्गठनासह विविध सवलती मिळाव्यात याकरिता हुपरी येथील जय शिवराय किसान संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देण्यात आले.
येत्या आठ दिवसांत याबाबत निर्णय न झाल्यास मंगळवार दि. २० फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.दुष्काळग्रस्त तालुक्यातील मुले शिक्षणासाठी इतरत्र आहेत त्यांची परीक्षा शुल्क माफ करण्याचा शासन निर्णय असताना संस्थाचालक फी वसूल करीत आहेत. ती तात्काळ रद्द करावी. दुष्काळपट्ट्यातील शेतकऱ्यांचे शेतीपंपाचे वीज बिल पूर्ण माफ करावे यांसह विविध प्रकारच्या मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.