मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामन्यादरम्यान रोहित शर्मा बाद झाल्यानंतर चिडवल्याच्या रागातून बंडोपंत बापू तिबिले (वय ६३, रा. हणमंतवाडी) यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. डोक्यात लाकडी फळी घातल्याने ते गंभीर जखमी झाले.
त्यांच्या जखमेवर सात टाके बसले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी (Doctor) सांगितले. करवीर पोलिसांनी (Karveer Police) या प्रकरणी बळवंत महादेव झांजगे (वय ५०) व सागर सदाशिव झांजगे (३५, दोघे रा. हणमंतवाडी) या दोघांना अटक केली आहे.
बुधवारी रात्री मुंबई इंडियन्स विरुद्ध हैदराबाद सनरायझर्स यांच्यात सामना सुरू होता. प्रथम फलंदाजीत हैदराबादने २७७ धावा केल्या. हे लक्ष्य मुंबईला पेलवणार का यावरून सर्वांनाच औत्सुक्य होते. हणमंतवाडीतील बळवंत झांजगे, सागर झांजगे मुंबई संघाचे समर्थन करत होते.
याच ठिकाणी बंडोपंत तिबिलेही सामना पाहत होते. उत्तरादाखल खेळण्यास आलेल्या मुंबईचा रोहित शर्मा बाद होताच तिबिले यांनी मुंबई समर्थकांना डिवचले. या रागातून बळवंत झांजगे यांनी काठीने तिबिले यांना मारहाण केली. सागर झांजगे याने लाकडी फळी तिबिले यांच्या डोक्यात घातल्याने ते रक्तबंबाळ झाले. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले.
त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. करवीर पोलिसांनी दोघा संशयितांना बुधवारी रात्रीच अटक केली. दोघांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. दोघांना दोन एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.