पंढरपुरातील वाहतूक मार्गात बदल! २६ फेब्रुवारीपर्यंत नियोजन

माघी यात्रेनिमित्त पंढरपूर शहरातील तसेच शहराबाहेरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. २० फेब्रुवारीला माघी यात्रा होणार असून २६ फेब्रुवारीपर्यंत हा बदल असणार आहे.

पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.नगर, बार्शी, सोलापूर, मोहोळकडून येणारी वाहने अहिल्यादेवी चौक, शेटफळ चौक मार्गे मोहोळ रोड विसावा येथे पार्क केली जाणार आहेत.

६५ एकर येथे फक्त दिंडी व पालखीचे वाहने पार्क करावीत. पुणे, सातारा, वाखरीमार्गे येणारी वाहने इसबावी विसावा येथील मैदानात पार्क करावीत. कराड, आटपाडी, दिघंची मार्गे येणारी वाहने वेअर हाऊस येथे पार्क करावीत. कोल्हापूर, सांगली, मिरज, सांगोला मार्गे येणारी वाहने कासेगाव फाटा, टाकळी बायपास मार्गे येऊन वेअर हाउस येथे पार्क करावीत.

तसेच विजापूर, मंगळवेढा मार्गे येणारी वाहने कासेगाव फाटा, टाकळीमार्गे बायपास मार्गे वेअर हाऊस व यमाई तुकाई मंदिर व बिडारी बंगला येथे पार्किंग करावीत.पंढरपूर शहरातून बाहेर जाणाऱ्या वाहने टेंभुर्णी, नगर, सोलापूर, लातूरकडे जाणाऱ्या सर्व वाहने सावरकर चौक, नवीन कराड नाका, कॉलेज क्रॉस रोड, कौठाळी बायपास, नवीन सोलापूर नाका मार्गे जातील.

पुणे-साताऱ्याकडे जाणारी वाहने सावरकर चौक, नवीन कराड नाका, कॉलेज क्रॉस रोड वाखरी मार्गे जातील तर विजापूर, कराड, आटपाडी, कोल्हापूर, सांगली, मिरज, मंगळवेढा मार्गे जाणाऱ्या सर्व गाड्या सावरकर चौक, नवीन कराड नाका, गादेगाव फाटापासून मार्गस्थ होतील.१६ ते २६ फेब्रुवारीदरम्यान प्रदक्षिणा मार्ग, महाव्दार चौक ते शिवाजी चौक, सावरकर चौक ते शिवाजी चौक मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद असेल.

बार्शी, सोलापूर मार्गावरुन तीन रस्तामार्गे येणारी हलकी वाहने फक्त अंबाबाई पटांगणात थांबतील. नियमित ट्रक व यात्रेसाठी सोडण्यात येणाऱ्या बसना जुना दगडी पूल व तीन रस्ता मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर मंगळवेढा नाका, महात्मा फुले चौक, लहुजी वस्ताद चौक या मार्गाने येणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंदी आहे.

अंबाबाई पटांगण ते भजनदास चौक, अंबाबाई पटांगण ते अर्बन बँक, शिवाजी चौक ते अर्बन बँक, संकुल कॉर्नर ते नगरपालिका हा मार्ग पासच्या वाहनांव्यतिरिक्त इतर वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.