दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची तालुकानिहाय शेतकरी व मदतीची रक्कम….

राज्यातील २२ लाख ३४ हजार ९३४ शेतकऱ्यांसाठी ही मदत सरकारने जाहीर केली आहे. २०२३मध्ये पावसाळी हंगामात यापूर्वी अतिवृष्टी, पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी मदत घेतली असल्यास त्या शेतकऱ्याला त्याच पिकांसाठी किंवा क्षेत्रासाठी ही मदत मिळणार नाही.

दरम्यान, सरकारने मदतीची मर्यादा तीन हेक्टरपर्यंत केली असून जिरायत क्षेत्रासाठी हेक्टरी साडेआठ हजार, बागायतीसाठी हेक्टरी १७ हजार आणि बहुवार्षिक पिकांसाठी २२ हजार ५०० रुपयांची मदत दिली जाणार आहे. २९ फेब्रुवारीला मदतीचा शासन निर्णय झाला, पण बहुतेक ठिकाणी अजून मदत वाटप सुरु झालेले नाही.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, माढा, करमाळा, माळशिरस व सांगोला या पाच तालुक्यांमध्ये ऑक्टोबरअखेर दुष्काळ जाहीर झाला आहे. आता २९ फेब्रुवारीला सरकारने बाधित शेतकऱ्यांसाठी मदत मंजूर केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील ४१ हजार ९६३ शेतकऱ्यांना ३७ कोटी ४७ लाख तर माळशिरसमधील एक लाख २३ हजार ९८० शेतकऱ्यांना १८३ कोटी १२ लाख,

सांगोल्यातील एक लाख १९ हजार ३४२ शेतकऱ्यांसाठी १५७ कोटी सात लाख रुपये, करमाळ्यातील एक लाख नऊ हजार ९१३ शेतकऱ्यांसाठी १४६ कोटी ९४ लाख रुपये आणि माढ्यातील एक लाख २४ हजार ६५१ शेतकऱ्यांसाठी १६४ कोटी ३८ लाख रुपयांची मदत मिळणार आहे. पण, अद्याप शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोचलेली नाही.