इचलकरंजीचा प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध…

महापालिकेने एक हजार हेक्टर रहिवासी क्षेत्राचा समावेश असलेला संपूर्ण शहराचा एकत्रित प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध केला. या विकास आराखड्यामध्ये शिवतीर्थ सुशोभीकरण, मोठे तळे विकास, रुग्णालये, खेळाचे मैदान आदींचा समावेश केला आहे.शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विकास आराखडा महत्त्वाचा असतो.

आतापर्यंत चार विकास आराखडे मंजूर करण्यात आले. मात्र, एकत्रित आराखडा नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. चारही आराखड्यांचा एकत्रित ताळमेळ घालताना कर्मचाऱ्यांना नाकीनऊ येत होते, तसेच हद्दी, रस्ते जुळत नव्हते. नवीन पद्धतीचा वापर केल्याने विकास योजना अचूक होण्यास मदत झाली आहे.

शहराची लोकसंख्या चार लाखांच्या घरात पोहोचली आहे. अनेक नागरी कामांसाठी आरक्षणाची आवश्यकता होती. त्यामुळे या सर्व विकास आराखड्यांचा एकत्रित विकास आराखडा तयार करण्याचा ठराव ३० जून २०२१ ला करण्यात आला होता.

हा विकास आराखडा भौगोलिक माहिती प्रणालीचा वापर करून तयार केल्याने बांधकामाचे क्षेत्र दिसते. त्यामुळे आरक्षण टाकताना सुलभता व अचूकता आली.यापूर्वी रहिवासी क्षेत्रामध्ये टाकलेली विविध आरक्षणे वगळली असून, अनेक नवीन आरक्षणेही अंतर्भूत केली आहेत. रहिवासी क्षेत्रातील आरक्षण वगळल्यामुळे मिळकतधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या विकास आराखड्यामध्ये रहिवासीबरोबरच औद्योगिक, सार्वजनिक, शेती, वाणिज्य आदींचा विचार केला आहे. शिवतीर्थच्या दुसऱ्या टप्प्याच्या विकासासाठी सभोवती आरक्षण टाकले आहे. तसेच मोठे तळे येथे पार्किंग व महापालिका वापरासाठी आरक्षण धरण्यात आले आहे.

रहिवासी क्षेत्र – एक हजार हेक्टरऔद्योगिक क्षेत्र – १६० हेक्टरयंत्रमाग उद्योग – १७५ हेक्टरसार्वजनिक क्षेत्र – ५४.३४ हेक्टरबगीचा व मैदाने – १३५ हेक्टरवाणिज्य क्षेत्र – ५८.७२ हेक्टरशेती क्षेत्र – ९१८ हेक्टरनागरी वापर क्षेत्र – ११६ हेक्टर