कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रत्येक तालुक्यात ३ भरारी पथके!

इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून (बुधवारी) सुरू होत आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली तब्बल २८ पथके नेमली आहेत.

दुसरीकडे जिल्ह्यातील इयत्ता बारावीच्या १६ तर दहावीच्या १४ संवेदनशील केंद्रांवर देखील महसूलचेच बैठे पथक असणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील इयत्ता दहावीच्या ६५ हजार ७४९ विद्यार्थ्यांसाठी १८२ केंद्रे असणार आहेत. दुसरीकडे इयत्ता बारावीतील ५२ हजार ८७० विद्यार्थ्यांसाठी ११८ परीक्षा केंद्रे असणार आहेत.

यंदा सरमिसळ पद्धत असल्याने परीक्षा केंद्रात वाढ झाली आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दोन दिवसापूर्वी परीक्षेसंदर्भातील आढावा बैठक घेतली. त्यावेळी कॉपीमुक्त परीक्षेसाठी ठोस नियोजन करण्याच्या सूचना माध्यमिक शिक्षण विभागाला देण्यात आल्या.

मात्र, माध्यमिक शिक्षणाधिकारी सध्या रजेवर असून ते मंगळवारी हजर होणार आहेत. पण, बुधवारपासून परीक्षा सुरू होणार असल्याने शिक्षण विभागाच्या भरारी पथकांचे नियोजन अर्धवटच आहे.