वनडे विश्वचषक २०२३ च्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने शानदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाचा ६ गडी राखून पराभव केला. या विजयानंतर सर्व खेळाडू खूप आनंदी होते आणि ड्रेसिंग रूममध्ये हसताना दिसले. या सामन्यात भारताची गोलंदाजी चांगली असताना क्षेत्ररक्षकांनीही कमाल केली. भारताच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत आणि क्षेत्ररक्षकांनी अचूक क्षेत्ररक्षण करत ऑस्ट्रेलियाला ऑलआऊट केले. त्यानंतर क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाने बीसीसीआयच्या वतीने कोहलीला विशेष मेडल देत पुरस्कार प्रदान केला.
भारत ऑस्ट्रेलिया सामन्यात विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांचा समावेश असलेल्या अनेक खेळाडूंनी शानदार क्षेत्ररक्षण केले. या तिघांमध्ये क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाच्या मते कोहलीची कामगिरी वाखाणण्याजोगी होती. अशा स्थितीत त्यांनी विराटला हे चमकणारे नवे कोरे पदक सुपूर्द केले. कोहलीला पदक मिळताच तो ते घेण्यासाठी उत्सुकतेने पुढे सरसावला. यानंतर विराटने हात वर करून आनंद साजरा केला आणि मग चॅम्पियनप्रमाणे पदक दातात पकडत पोझ दिली.
विराटचा शानदार झेल
या सामन्यात भारतीय स्टार विराट कोहली मैदानात खूप सक्रिय दिसला. स्लिपमध्ये उभे असताना कोहलीने पहिल्याच षटकात मिचेल मार्शचा अप्रतिम झेल घेतला. विराटने स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करताना डाइव्ह मारत असा भन्नाट झेल टिपला की सगळे बघतच राहिले. मार्शला या सामन्यात खातेही उघडता आले नाही आणि तो बुमराहचा बळी ठरला. यानंतर विराटने डेथ ओव्हरमध्ये हार्दिक पांड्याच्या चेंडूवर अॅडम झाम्पाचा झेल घेतला. सामन्यानंतरच्या मुलाखतीत भारतीय कर्णधार रोहित शर्मानेही संघाच्या क्षेत्ररक्षणाचे कौतुक केले.