हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबई आणि ऋषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्ली (mumbai indians vs delhi capitals ) विजयाची गाडी पटरीवर आणण्यासाठी मैदानात उतरणार आहे. मुंबईला अद्याप पहिल्या विजयाची प्रतिक्षाच आहे. तर दुसरीकडे दिल्लीला चार सामन्यात फक्त एक विजय मिळवता आला आहे, त्यामुळे दिल्लीकडूनही विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले जातील. आज आयपीएलमध्ये दोन सामने खेळवले जाणार आहे. मुंबई आणि दिल्ली यांच्यातील सामना दुपारी तीन वाजता वानखेडे मैदानावर होणार आहे.
सूर्यकुमार यादव परतल्यामुळे मुंबईची ताकद वाढली आहे. पण दुखापतीमधून कमबॅक करणाऱ्या सूर्याला सूर गवसणार का? याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. दुसरीकडे दिल्लीचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आणि वेगवान गोलंदाज मुकेश कुमार दुखापतीमधून 100 टक्के तंदुरुस्त झालेले नाहीत. त्यामुळे दिल्लीची गोलंदाजी कमकुवत जाणवत आहे. दिल्ली आणि मुंबईची गुणतालिकेतील स्थिती जवळपास सारखीच आहे.
दिल्ली नवव्या तर मुंबई दहाव्या क्रमांकावर आहे. दिल्ली आणि मुंबई संघाला आयपीएलमधील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी विजय अनिवार्य आहे, त्यामुळे आजचा सामना रंगतदार होईल, यात शंकाच नाही. मिस्टर 360, स्कॉय अर्थात आपला सूर्यकुमार यादव आयपीएल खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. दुखापतीनंतर तो आयपीएलमध्ये कमबॅक करतोय. एनसीएकडून सूर्याला फिटनेस प्रमाणपत्र मिळाले, त्यानंतर सोशल मीडियावर मुंबईच्या चाहत्यांकडून सेलेब्रेशन करण्यात येत आहे.
आजच्या सामन्यात सूर्या कशी कामगिरी करतो? याकडे चाहत्यांच्या नजरा असतीलच. दुखापतीमुळे तीन महिने सूर्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. त्यामुळे सूर्याला पहिल्या सामन्यात लय मिळणार का? सूर्याच्या कमबॅकनंतर कुणाचा पत्ता कट होणार? हे काही वेळात स्पष्ट होईल.