माघी यात्रेचा सोहळा अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपल्याने राज्यभरातून लाखो भाविक पंढरीत दाखल होत आहेत. यात्रेला आलेल्या भाविकांच्या गर्दीने श्री विठ्ठल मंदिर परिसर, प्रदक्षिणामार्ग, चंद्रभागा नदीचे वाळवंट, ६५ एकर परिसर गजबजून गेला आहे.
दरम्यान, श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग रविवारी (ता.१८) दुपारी सहा नंबरच्या पत्रा शेडपर्यंत गेली होती तर श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी सुमारे सात तास लागत होते. माघी एकादशीला जया एकादशी, असेही संबोधले जाते.
यावर्षी उद्या मंगळवारी (ता. २०) माघी एकादशीचा सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या विविध भागातून लाखो भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. सलग आलेल्या सुट्ट्या व माघी यात्रा यामुळे यावर्षी नवमी दिवशीच श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग गोपाळपूर रस्त्या लगतच्या सहा नंबरच्या पत्रा शेडपर्यंत गेली होती.
गोपाळपूर रस्त्या लगतच्या पत्रा शेड दर्शन रांगेतील भाविकांसाठी श्री विठ्ठल मंदिर समितीच्या वतीने विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दर्शन रांगेतील भाविकांच्या पायाखाली रबरी मॅटिंग, कुलर फॅन, विश्रांती कक्ष, कचरा बॅग, प्रथमोपचार केंद्र, आपत्कालीन मदत केंद्र, पिण्याचे पाणी, मोफत खिचडी वाटप करण्यात येते आहे. या शिवाय यंदा प्रथमच दर्शन रांगेत घुसखोरी होऊ नये याकरिता लोखंडी बॅरिकेटिंगच्या दोन पाईपमधील अंतर कमी करण्यात आले आहे.