सोलापूर महापालिकेने मावा विक्रेता आणि खाण्याऱ्यांवर दंडात्मक कारवाई मोहीम सुरू केली आहे. शहरातील पानटपरी परिसरातील माव्याचे लाल डाग धुवायला लावले. तर काही ठिकाणी थुंकणाऱ्याकडून रस्ता स्वच्छ करून घेतला. तसेच पानटपरीवर मावा विक्री होते का? याची तपासणी केली. सोमवारी शहरातील सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या ६९ जणांवर दंडात्मक कारवाई केली.
आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या आदेशान्वये आणि अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुटखा व मावा, सार्वजनिक भागात थुंकणारे व लघुशंका करणाऱ्या नागरिकांवर पायबंद घालणे, तसेच प्लस्टिक बंदी आदी मोहीम हाती घेण्यात आली आहे. विभागीय कार्यालयाकडून ठिकठिकाणी विविध पानटपरीधारकांना थुंकलेले साफ करायला लावले. सोलापूर शहरातील गड्डा कॉर्नर, रेल्वे स्टेशन परिसर,
भवानी पेठ, विडी घरकुल, गांधी नगर, अक्कलकोट रोड, जोडभावी पेठ, बुधवार पेठ, मंगळवार बझार, चिप्पा मार्केट, एमआयडीसी, सुनीलनगर, नीलमनगर, बनशंकरीनगर, आकाशवाणी रोड, आसरा चौक, नई जिंदगी, ओम गर्जना चौक, विनायकनगर, मरिआई चौक, कल्याणनगर, विजापूर नाका, किडवाई चौक, जगदंबा चौक, गुरुनानक चौक अशा विविध सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबाबत एकूण ६९ व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करून १६ हजार ५० इतकी रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात आली आहे.
मावा विक्रेत्यांवर कारवाई होत असल्याने शहरातील मावा विक्रेते धास्तावले आहेत. तरीपण, अनेकांनी खुलेआम विक्री बंद करुन आडोशाला मावा विक्री सुरु केली आहे. अनेकांनी टपरीजवळ एक रिक्षा किंवा वाहन लावून त्यात मावा विक्रीसाठी ठेवल्याचेही चित्र आहे. अशा लोकांवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.