देशातील सर्वात लांब सागरी पूल अटल सेतूवरुन आजपासून एसटी महामंडळाची शिवनेरी बस धावणार आहे. शिवडी-न्हावाशेवा ब्रिजवरून पुणे-मंत्रालय, स्वारगेट-दादर शिवनेरी बस आजपासून धावणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ २५ टक्क्यांनी कमी होणार आहे.
सध्या प्रायोगिक तत्त्वावर पुणे-मंत्रालय बस सकाळी ६.३० आणि स्वारगेट-दादर बस सकाळी ७ वाजता सुटणार आहेत. त्यानंतर सकाळी ११ व दुपारी १ वाजता या बस मंत्रालय व दादर येथून निघतील.
त्यामुळे गर्दीच्या वेळी प्रवासाचा सुमारे एक तास वाचणार आहे. बस पुणे येथून थेट पनवेल न्हावाशेवा, शिवडीमार्गे मंत्रालय आणि दादर येथे पोहोचतील. यामुळे नागरिकांचा प्रवास वेगाने होणार आहे. सध्या मुंबई-पुणे मार्गावर दररोज २१० शिवनेरी बस चालवल्या जात आहेत. मुंबई-पुणे हे अंतर कापण्यासाठी सध्या जवळपास चार तास लागतात. मात्र अटल सेतू मार्गे दादर आणि कळंबोली दरम्यानचे १४ थांबे सोडून प्रवास सुलभ करण्याचे एसटी महामंडळाचे उद्दिष्ट आहे. यामुळे वेळही वाचणार आहे.
या मार्गावरुन शिवनेरीने प्रवास करण्यासाठी प्रवासी www.msrtc.gov.in आणि www.npublic.msrtcors.com या अधिकृत वेबसाइट्सद्वारे तसेच मोबाइल ॲपद्वारे ऑनलाइन तिकीट सहजपणे बुक करू शकतात.