विविध कार्यक्रमांनी वस्त्रनगरी झाली शिवमय

काल शिवजयंतीनिमित्त इचलकरंजी शहर अगदी शिवमय झालेले होते. इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास, कॉ. मलाबादे चौक येथील राज्याभिषेक सोहळा फलकास आणि छत्रपती शिवाजी उद्यान येथील अर्ध पुतळ्यास आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते आणि आम. प्रकाश आवाडे, अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे, सौ. निलीमा दिवटे, उपविभागीय अधिकारी मौसमी चौगुले, उपायुक्त तैमूर मुलाणी, पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे, तहसीलदार कल्पना ढवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले.

ढोल ताशांचा गजर आणि तुतारी वादनाने भारावलेले वातावरण, पोवाड्यांमधून उलगडणारी शिवाजी महाराजांची शौर्यगाथा, जय भवानी जय शिवाजीचा अखंड जयघोष अन् भगवे ध्वज हातात घेऊन उत्साहात सहभागी झालेले आबालवृद्ध आणि अखंडपणे सुरु असलेला शिवरायांच्या जयजयकार उत्साही वातावरणात इचलकरंजीत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदर, प्रेम आणि अभिमान व्यक्त करण्यासाठी शिवप्रेमींनी विविध कार्यक्रमांतून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी केली. विविध सामाजिक, सांस्कृतिक संघटनांनी मिरवणुका काढून, सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करून, शिवाजी महाराजांना मानवंदना दिली.

यावेळी महानगरपालिका बालवाडी विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी उद्यान येथे शिव जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला. तसेच महाराष्ट्र राज्यगीत गर्जा महाराष्ट्र माझा गायन कार्यक्रम संपन्न झाला. शिवजयंतीनिमित्त शहरातील विविध मंडळांच्यावतीने दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तर सायंकाळनंतर विविध मंडळातर्फे मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. त्यामुळे दिवसभर वस्त्रनगरीत शिवमय वातावरण निर्माण झाले होते.