मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण देण्यासाठी आणि सगेसोयरे अध्यादेशाच्या अमलबजावणीच्या मागणीबाबत पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी मनोज जरांगे यांनी आज आंतरवाली सराटीमध्ये बैठक बोलावली आहे. त्यापूर्वी जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. ‘निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विशेष अधिवेशनात स्वतंत्र मराठा आरक्षणाचा निर्णय झाला असून, आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही’ असे मनोज जरांगे म्हणाले आहेत.
यावेळी बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, “पुन्हा-पुन्हा जाणून बुजून सरकारने उपोषणाची, आंदोलनाची वेळ आणली आहे. सरकारला जे अपेक्षित होत ते झाले नाही. सरकारने आणखी शहाणे झाले पाहिजे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विशेष अधिवेशनात स्वतंत्र मराठा आरक्षणाचा निर्णय झाला असून, आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही. आज दुपारी 12 ते 1 वाजेच्या दरम्यान बैठक होणार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास होता, विश्वासघात होऊ नये असे त्यांनी वागावे, शेवटी समाज महत्वाचा आहे. मुख्यमंत्र्यांची शपथ अपूर्ण आहे असे मान्य करावे.
मला यात राजकारण करायचे नाही, सत्ताधाऱ्यांकडुन ही नाही आणि विरोधकांकडुन नाही. मराठा समाजाच्या तरुणांवर फुकट दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत. सगेसोयरे प्रमाणे आरक्षण दिले असते तर समाज खुश झाला असता. पण समाज नाराज आहे. कालच्या अधिवेशनात दोन्ही आरक्षण दिले असते, तर 15 दिवस तुमच्या अंगावरचा गुलाल निघाला नसता, असे मनोज जरांगे म्हणाले आहेत.