छगन भुजबळ – शरद पवार भेटीने बदलणार का आगामी राजकारणाची गणितं ?

राज्याच्या राजकारणात एक वेगळं वळण निर्माण करेल अशी घटना आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पाहायला मिळाली. अचानक अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या भेटीला गेले आणि सर्वच राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचवल्या आहेत. दरम्यान छगन भुजबळ यांनी आरक्षणाच्या प्रश्नासाठी मी कुणालाही भेटायला तयार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटेन, राहुल गांधींना देखील भेटेन असं छगन भुजबळ  यांनी स्पष्ट केलं आहे. 

छगन भुजबळ सोमवारी 10 वाजून 20 मिनिटांनी सिल्वर ओक निवासस्थानी आले. त्यानंतर साधारणपणे सव्वा बारा वाजता सिल्वर ओक निवासस्थानातून बाहेर पडले. शरद पवार हे आजारी असल्यामुळे आणि कोणतीही पूर्वसूचना न देता भुजबळ आल्यामुळे त्यांना तब्बल दीड तास वेटिंगवर थांबाव लागलं. मी पवारांची वेळ घेतली नव्हती त्यामुळे मला त्यांची वाट पाहत थांबाव लागलं. ते आजारी असल्यामुळे कुणालाच भेटत नाहीत, असं भुजबळ यांनी सांगितलं. 

छगन भुजबळ जरी अचानक शरद पवारांच्या भेटीसाठी पोहचले असले तरी माध्यमांमध्ये मात्र शरद पवार भुजबळ भेटीच्या जोरदार चर्चा सुरु झाल्या होत्या. किंबहुना आगामी काळात काही वेगळं गणित तर शरद पवारांच्या डोक्यात नाहीत ना अशा ही चर्चा रंगू लागल्या होत्या. ही बाब लक्षात येताच तात्काळ शरद पवारांच्या कार्यालयाकडून भुजबळांना कोणतीही वेळ देण्यात आली नव्हती, असं स्पष्ट करण्यात आलं. तसेच ते मागील दीड तासांपासून शरद पवारांच्या भेटीसाठी वेटिंगवर असल्याची माहिती देण्यात आली.