इचलकरंजीतील बंद सीसीटीव्ही तातडीने सुरू करण्याची मागणी

इचलकरंजी शहर संवेदनशिल म्हणून ओळखले जाते. तसेच शहरामध्ये वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी विविध स्तरावर पोलिस खात्याकडून कारवाईचा बडगा उगारला जातो. त्यामध्ये शहरातील विविध चौकामध्ये तसेच मुख्य मार्गावर वारवार चेन स्नॅचिंग, मारामारी, खून आदि प्रकार होत असतात. तसेच शहरात मुख्य रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. मात्र अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेल्या खांबांची दुरावस्था झाली असून सदरचे खांब कधीही मोडून पडण्याच्या स्थितीत आहेत.

इचलकरंजी शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी तसेच नियम तोडून वाहतुक करणाऱ्यांवर दंड व जरब बसवण्यासाठी प्रशासनाच्यावतीने शहरातील मुख्य रस्त्यासह विविध चौकामध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. मात्र यातील बहुतांशी कॅमेरे बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे शहराची सुरक्षा बेभरवशाची आहे. तेव्हा वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी शहराचा तिसरा डोळा ( सीसीटीव्ही) कार्यान्वित करण्यासाठी तातडीने पाऊले उचलावीत अशी मागणी नागरिकांतून होत आहे.