इचलकरंजी शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नाबाबत नागरिकांच्या प्रचंड रोष निर्माण होत आहे. सावित्रीच्या लेकी ग्रुपच्यावतीने चार महिलांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.
‘आम्ही सावित्रीच्या लेकी’ महिला गटाच्या वतीने सुरू असलेल्या बेमुदत आमरण उपोषणास पाठिंबा व सुळकूड पाणी योजना तत्काळ सुरू करावी, या मागणीसाठी सुळकूड पाणी योजना कृती समितीच्या वतीने गुरुवारी (ता.२२) सकाळी १० वाजता महात्मा गांधी पुतळा चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान, तिसऱ्या दिवशी उपोषणामधील महिलांची प्रकृती खालावल्याचे दिसून आले.
सुळकूड पाणी योजनेच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून सावित्री हजारे, शोभा इंगळे, सुषमा साळुंखे व ज्योत्स्ना भिसे या चार महिला म. गांधी पुतळा येथे उपोषणास बसल्या आहेत. त्यांना सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे.
उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी व्यंकोबा मैदान समस्त पैलवान, इचलकरंजी नागरिक मंच, वैभव उगळे शिवसेना जिल्हाप्रमुख, सरोजिनी महिला मंडळ, भागीरथी महिला संस्था, इनाम महिला मंच, जिजाऊ घे उंच भरारी ग्रुप, यशवंत बिग्रेड, धनगर समाज, इचलकरंजी बार असोसिएशन यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. तर सुळकूड पाणी योजना कृती समितीच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी म. गांधी चौक येथे रास्ता रोको करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी विविध पक्षांचे आणि संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
इचलकरंजी शहरासाठी मंजूर झालेल्या सुळकूड पाणी योजनेबाबत मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत तातडीने बैठक घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे इचलकरंजी महानगर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी केली. याबाबतचे निवेदन त्यांनी मुंबई येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना दिले. यावेळी उद्योग आघाडी प्रदेशाध्यक्ष सुभाष मालपाणी, इचलकरंजी शहर कार्याध्यक्ष अमित गाताडे उपस्थित होते.