सोलापूर जिल्ह्यात इंग्रजी विषयाचा पहिला पेपर कॉपीमुक्त

सध्या बारावीची परीक्षा सुरु आहे. पहिला पेपर हा इंग्रजीचा होता. इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा पहिला इंग्रजीचा पेपर सोलापूर जिल्ह्यातील ११८ केंद्रांवर परीक्षा सुरळीत; इंग्रजी विषयाचा पहिला पेपर कॉपीमुक्त कॉपीमुक्त पार पडला. इंग्रजीचा पेपर असल्याने जिल्ह्यातील ४६ भरारी पथकांनी वेगवेगळ्या केंद्रांना भेटी दिल्या. बैठे पथकांनाही सक्त सूचना होत्या.

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ११८ केंद्रांवर एकही कॉपी केस आढळली नाही. ५६ हजार १६९ विद्यार्थ्यांनी इंग्रजीचा पेपर दिला.सोलापूर जिल्ह्यात इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी एकूण ११८ केंद्रे असून त्यापैकी १६ केंद्रे संवेदनशील आहेत. भरारी पथकांचा सर्वाधिक वॉच याच केंद्रांवर होता. पण, ना संवेदनशील केंद्रांवर ना इतर कोणत्याही केंद्रावर विद्यार्थी कॉपी करताना सापडला. ८७ दिव्यांग विद्यार्थ्यांसह जिल्ह्यातील एकूण ५७ हजार १८८ विद्यार्थ्यांपैकी ५६ हजार १६९ विद्यार्थ्यांनी इंग्रजीचा पहिला पेपर सोडविला.

मात्र, एक हजार १९ विद्यार्थी वेगवेगळ्या कारणास्तव परीक्षेला आले नाहीत. दरम्यान, परीक्षेसाठी वर्गात जाताना सर्वच परीक्षार्थींची अंगझडती घेण्यात आली. सर्वच केंद्रातील हालचालींवर बैठे पथकांचे लक्ष होते. भरारी पथकांची संख्या मोठी असल्याने कोणीही अचानक येवू शकते या धास्तीने परीक्षेतील गैरप्रकार थांबल्याची स्थिती पहिल्याच दिवशी मंगळवारी पाहायला मिळाली.