सोलापूरमध्ये भाजप देणार नवा चेहरा….

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून गाठीभेटी घेत तिकिटासाठी प्रयत्न केले जात आहेत.महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये यंदा चुरशीची लढाई होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष फुटल्याने यंदा जागावाटपाचं गणितही बदलणार आहे.

या पार्श्वभूमीवर काही नेते आपला पक्ष सोडून मित्रपक्षाच्या चिन्हावरही निवडणूक लढवू शकतात. सोलापूर लोकसभेतही असंच चित्र पाहायला मिळण्याची शक्यता असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर हे भाजपकडून सोलापूरलोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

दोनच दिवसांपूर्वी त्यांनी वेळापूर येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला असून, त्यात सोलापूर लोकसभेची निवडणूक लढविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. जानकर यांच्याकडून सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रत्यक्ष प्रचारालाही सुरुवात करण्यात आली आहे.