ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या खुनातील पहिला संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड यांच्या जप्त मोबाईल हॅण्डसेटमधील मेमरी कार्ड आणि आवाज पडताळणीतील पंचाची काल न्यायालयात साक्ष झाली, अशी माहिती विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी दिली.
जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली. आज (ता. १०) उलट तपास होणार आहे. ॲड. राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पानसरे खून खटल्यातील पहिला संशयित समीर गायकवाडकडून मोबाईल हॅण्डसेट जप्त केला आहे. त्यामध्ये ऑटो रेकॉर्डिंग होते.
यातील पोलिसांनी मेमरी कार्ड जप्त केले, तसेच त्यातील आवाज त्याचाच आहे याचीही पडताळणी केली. त्यावेळी असलेल्या पंच साक्षीदाराची साक्ष आज न्यायालयात झाली. समीरच्या संभाषण स्क्रिप्टमध्ये नाशिकच्या कुंभमेळ्यात जाण्याच्या संदर्भाने ‘लई पापं केलेली आहेत, दोन डुबकी मारून येतो’, यासह ‘कामगार युनियन संघटना, पानसरे…’ यांचेही संदर्भ मिळाले.
तसेच समीरच्या आवाजाचा नमुना स्क्रिप्टच्याच वाक्यांच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. तोही न्यायालयात लावून दाखविला. तो आवाज समीरचाच आहे हे न्यायालयात साक्षीदारासह सर्वांना ऐकविले. यावेळी समीर गायकवाड, संशयित आरोपींचे वकील अनिल रुईकर, वीरेंद्र इचलकरंजीकर, प्रिती पाटील सुद्धा न्यायालयात उपस्थित होते.
समीरचा मोबाईल वाजला अन्…
समीर गायकवाड सध्या जामिनावर आहे. आजच्या सुनावणीला तो न्यायालयात हजर होता. सुनावणी सुरू असतानाच त्याच्याजवळील मोबाईल हॅण्डसेट वाजला. त्यामुळे न्यायालयाने त्याला खडेबोल सुनावले. पोलिसांनी त्याच्याकडील मोबाईल हॅण्डसेट काढून घेतला.