मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी त्यांचा दौरा जिल्ह्याच्या पूर्व भागात होणार असून लोकसभा निवडणूक तयारीचा हा भाग मानला जात आहे.या निमित्ताने वस्त्रोद्योगाचे प्रलंबित प्रश्न, रखडलेली दूधगंगा सुळकुड पाणी योजना, पंचगंगा नदी प्रदूषण, राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे निर्माण होणारा महापुराचा प्रश्न अशा ज्वलंत समस्या उभ्या राहिल्या असून त्यावर होणारे मुख्यमंत्र्यांचे भाष्य निवडणुकीला निर्णायक वळण देणारे ठरणार आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कोल्हापूर यांचे अलीकडे अतूट नाते ठरत आहे.
जवळपास प्रत्येक महिन्याला ते कोल्हापूरला येत असल्याचे दिसत आहे. पंधरवड्यापूर्वीच शिवसेनेचे अधिवेशन कोल्हापुरात पार पडले. आता विधिमंडळात अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर ते पुन्हा एकदा ३ तारखेला हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी नजिक असलेल्या कोरोची या गावी महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत कार्यक्रमासाठी ते येणार आहेत.