कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून सीपीआरची पाहणी 

ठाण्यानंतर नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या मृत्यूतांडवानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात सरकारी रुग्णालयांची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी रविवारी मध्यरात्रीच सीपीआरला अचानक भेट देत पाहणी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधत जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय रुग्णालयांना भेटी देण्याच्या सूचना दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रेखावार यांनी सीपीआरमधील विविध विभागांची व वॉर्डची पाहणी केली. 

रेखावार यांनी सीपीआर रुग्णालयातील विविध विभागांची स्वच्छता, रुग्णालयाकडून दिल्या जाणाऱ्या आरोग्य विषयक सेवा सुविधा, औषधसाठा तसेच यंत्रसामुग्रीची माहिती घेतली. प्रसृती विभाग, नवजातशिशु, अतिदक्षता विभागासह विविध विभागांना भेटी देवून त्यांनी पाहणी केली. सीपीआरमध्ये उपचारासाठी येणाऱ्या कोणत्याही नागरिकांना औषधोपचाराअभावी परत पाठवू नये. तपासणीसाठी येणाऱ्या व दाखल रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याच्या सूचना करुन सतर्क राहण्याचे आदेश त्यांनी दिले. 

ऑपरेशन थिएटर, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, औषधे यांची चौकशी करून खात्री केली. रात्रपाळीच्या अधिकाऱ्यांनी औषधांचा पुरेसा साठा असल्याचे सांगितले. यावेळी सुपरिडेंटसह नर्स, कर्मचारी उपस्थित होते. उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांवर योग्य उपचार करावेत, औषधे उपलब्ध करून द्यावीत, अशा सूचना त्यांनी केल्या. औषधांचा साठा संपण्यापूर्वी नवीन साठा उपलब्ध होईल, याचे नियोजन करावे. ई-सुश्रुत किंवा ई-औषधी या पोर्टलवर माहिती देत रहावे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच परिसर स्वच्छ ठेवावा, असेही सांगितले.

जिल्हा रुग्णालये अद्ययावत करणार

दुसरीकडे 25 जिल्ह्यांमध्ये नवीन अद्ययावत आणि सर्व सुविधा असलेली जिल्हा रुग्णालये उभारण्याचे तसेच सध्या वैद्यकीय महाविद्यालयांशी जोडलेल्या जिल्हा रुग्णालयांचे श्रेणीवर्धन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी आजच्या बैठकीत दिले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव, वैद्यकीय शिक्षण सचिव यांच्या समितीने पुढील 15 दिवसांत आराखडा तयार करावा असे ते म्हणाले. 14 जिल्ह्यातील स्त्री रुग्णालयांना देखील पुरेसे बळकट करा असे त्यांनी निर्देश दिले. मोठ्या शस्त्रक्रियांसाठी राज्यातील जिल्हा रुग्णालयांत सुविधा असल्या पाहिजेत असेही ते म्हणाले. प्राथमिक उपकेंद्र, उप जिल्हा रुग्णालये, सक्षम झाल्यास शहरातील शासकीय आरोग्य यंत्रणांवर ताण येणार नाही असेही ते म्हणाले.  

जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा नियोजनमधून औषध खरेदीचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे त्यांनी वेळ न गमावता आपापल्या जिल्ह्यांतील औषध खरेदी, वैद्यकीय उपकरण खरेदी दरपत्रकानुसार तत्काळ करून घ्यावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.